लंडन :
ब्रिटनमध्ये शुक्रवारी उशिरा रात्री सुमारे दीडच्या सुमारास सरकारने अचानक इमर्जन्सीची घोषणा केली. क्लॉडिया वादळाच्या तडाख्यानंतर झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. पर्यावरण एजन्सीकडून उच्चस्तरीय पूर इशारे देण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
वादळाच्या तडाख्यामुळे देशभरात वाहतूक विस्कळीत झाली असून, नदीकाठच्या भागांत पूरस्थितीमुळे हजारो नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 20 हून अधिक घरं पाण्याखाली गेल्याची नोंद असून, आतापर्यंत 12 हजारांहून अधिक कुटुंबे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली आहेत.
शनिवार दुपारपर्यंत इंग्लंडमधील विविध भागांत 58 पेक्षा अधिक गंभीर पुराचा इशारा आणि 150 हून अधिक पूर सूचनांचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. काही नद्यांची पाणीपातळी सतत वाढत असल्याने आगामी तास अत्यंत महत्वाचे ठरणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
बचाव कार्य युद्धपातळीवर :
पूरग्रस्त भागांत बचाव दल, पोलीस आणि स्थानिक आपत्कालीन पथकं सतत काम करत आहेत. पूरामुळे कोसळलेल्या घरांचा ढिगारा हटविणे, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे आणि वैद्यकीय मदत पोहोचवणे सुरू आहे.
पर्यावरण एजन्सीचे फ्लड ड्यूटी मॅनेजर कुटबर्टसन यांनी सांगितले,
“ज्यांनी या पुरात आपलं घर गमावलं आहे, त्या सर्वांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. वेळेत दिलेल्या अलर्टमुळे मोठा अनर्थ टळला, मात्र नुकसान मोठे असून परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रित नाही.”
धोका अद्याप कायम
वादळ ओसरले असले तरी पूराचा धोका अजूनही टळलेला नाही. काही नद्यांमध्ये पाणीपातळी कमी न झाल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
Users Today : 18