मुर्तिजापूर |
जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक (भा.पो.से.) यांनी नुकतीच मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला भेट देऊन वार्षिक निरीक्षण केले. या वेळी त्यांनी पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाचा सखोल आढावा घेतला.
वार्षिक निरीक्षणादरम्यान पोलीस अधीक्षकांनी अभिलेख, गुन्हे नोंदवही, तपासाची सद्यस्थिती, मालमत्ता नोंदी तसेच प्रशासकीय कामकाजाची बारकाईने तपासणी केली. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देतानाच, गुन्ह्यांच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर त्यांनी भर दिला. महिला व बालकांशी संबंधित तक्रारी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळाव्यात, प्रतिबंधात्मक कारवाई व बीट प्रणाली अधिक प्रभावी करावी, तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, ‘राज्य गणेशोत्सव’चे औचित्य साधून अकोला जिल्हा पोलीस दल व मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने भारतीय ज्ञानपीठ विद्यालय येथे निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील १० ते ११ नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धा ५ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी अशा दोन गटांत घेण्यात आल्या.
या स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे व ठाणेदार अजित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे एकाग्र राहावे, सोशल मीडियाच्या आहारी न जाता शासन व शालेय स्तरावरील सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, सेंट स्कूल, व्यंकटेश बालाजी हायस्कूलसह विविध शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धांमध्ये चमकले. तसेच या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर, प्रा. दीपक जोशी, प्रतिक कुहेकर व शाम वाळसकर यांचाही पोलीस दलाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या संयुक्त उपक्रमामुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता अधिक ठळकपणे समोर येण्यासोबतच, सामान्य जनता व विशेषतः विद्यार्थी वर्गाशी पोलीस दलाचा सकारात्मक संवाद अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
Users Today : 12