विरोधानंतरही भाजपमध्ये पक्षप्रवेश; आमदार देवयानी फरांदे भावुक, कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर व्यक्त केली नाराजी

Khozmaster
2 Min Read

नाशिक

मध्ये भाजपमध्ये झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, या पक्षप्रवेशाला नाशिकमधील स्थानिक भाजप नेत्यांकडून विरोध व्यक्त करण्यात आला होता. मात्र या विरोधानंतरही पक्षप्रवेश पार पडल्याने भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

या पक्षप्रवेशाबाबत आपल्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असे सांगत आमदार देवयानी फरांदे यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना त्या भावुक झाल्या.

आपली भूमिका स्पष्ट करताना फरांदे म्हणाल्या की, “मी कोणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझं मत असं होतं की त्या ठिकाणी आधीच सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा पक्षप्रवेश झाला होता. उर्वरित कार्यकर्त्यांना घेऊन त्यांच्यासोबत पॅनल केलं असतं, तर ते शंभर टक्के निवडून आले असते.”

त्या पुढे म्हणाल्या, “वर्षानुवर्षे जे कार्यकर्ते त्या मतदारसंघात काम करत आहेत, त्यांना संधी मिळताना दिसत होती. बाहेरून एक आणि आतून तीन उमेदवार असते, तर पक्ष निश्चितपणे विजयी झाला असता, अशी माझी भूमिका होती.”

गेल्या चार दशकांतील पक्षनिष्ठेचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, “गेल्या चाळीस वर्षांत माझ्यावर अन्याय झाला असला, तरी मी कधीही स्वतःसाठी भूमिका घेतली नाही. मी आजही पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. पण जर प्रत्येकाने आपापलं पाहिलं, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना पाठबळ कोण देणार?”

भावनिक होत पुढे बोलताना फरांदे म्हणाल्या, “मी एक सामान्य कार्यकर्ती आहे. माझ्यासमोर जर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल, तर ते मला योग्य वाटत नाही. जे आज पक्षात आले आहेत, वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचे स्वागत करते. मात्र आज जे घडलं, ते मला आवडलेलं नाही.”

या घटनेमुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत समन्वय आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

0 9 4 5 7 3
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *