जयपूर
विजय हजारे ट्रॉफी २०२५–२६ स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात मुंबई क्रिकेट संघाने उत्तराखंडविरुद्ध दमदार फलंदाजी करत ५० षटकांत ७ गडी गमावून ३३१ धावा केल्या. सर्फराज खान आणि मुशीर खान या सख्ख्या भावांच्या अर्धशतकी खेळींसह हार्दिक तामोरेच्या झंझावाती डावामुळे मुंबईला ३०० पार मजल मारता आली.
मुंबईसाठी हार्दिक तामोरेने निर्णायक क्षणी सर्वाधिक धावा करत डाव सावरला. तो नर्व्हस नाईंटीचा बळी ठरला, मात्र त्याने खेळलेली झुंजार खेळी मुंबईसाठी अत्यंत मोलाची ठरली. सर्फराज खान आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी अर्धशतके झळकावत डावाला भक्कम पाया दिला.
दरम्यान, मुंबईच्या पहिल्या विजयाचा हिरो ठरलेला रोहित शर्मा या सामन्यात अपयशी ठरला. उत्तराखंडविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. मात्र इतर फलंदाजांनी वेळोवेळी योगदान देत संघाची धावसंख्या मजबूत केली.
मुंबईने उभारलेल्या ३३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग उत्तराखंडला करता येतो की नाही, हे सामना संपल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
Users Today : 8