धामणगाव धाड प्रतिनिधी ;-
शेतकऱ्यांनी हिवाळी अधिवेशनात शासनाकडून कापसाला उचित भाव मिळेल अशी मनोमन आशा ठेवली होती, मात्र अधिवेशनात या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर कोणतीही ठोस कामगिरी न करता वेळ वाया गेला. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच वाढले आहे.
शेतकरी समाजाला “राजा” म्हटले जाते, तरी सध्या परिस्थिती अशी आहे की या राजा भिकारीसारखे हतबल झाले आहेत. अतिवृष्टी, नापिकी, महागाई, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, यामुळे शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. दिवाळीही आर्थिक विवंचनेत आणि महागाईत अधांरात गेली.
हिवाळी अधिवेशनात शासनाकडून कापसाला भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु कापसासह इतर कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नाला हात न घालता, अधिवेशन एक आठवड्यात संपून गेला. निसर्गानेही साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका सुरूच आहे.
बियाणे, रासायनिक खते, मजुरांची वाढलेली मजुरी यामुळे शेतीचा खर्च अमाप वाढला असून, उत्पन्न तुलनेत नगण्य असल्याने पिकवलेला मालाची किंमत लागत नाही. या सर्व अडचणींमुळे शेतकरी आता शेती करावी की नाही, असा प्रश्न पडला आहे.
शेतकऱ्यांच्या या हतबल परिस्थितीवर शासनाची त्वरित भूमिका आणि कापसाला उचित भाव देणे गरजेचे आहे, अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
Users Today : 17