जानेफळ प्रतिनिधी –
समाजातील रूढी-परंपरांना छेद देत आणि सर्वसमावेशकतेचा नवा आदर्श निर्माण करत, माधुरी पवार, देवानंद पवार फाउंडेशन आणि सखी रिसायकल्स यांच्या वतीने आयोजित ‘हळदी-कुंकू’ सोहळा जानेफळमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावूक वातावरणात पार पडला.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जात-पात आणि धर्माच्या भिंती ओलांडून हजारो महिला एकत्र आल्या. विशेषतः समाजात उपेक्षित राहिलेल्या विधवा महिलांना सन्मानाने सहभागी करून मुख्य प्रवाहात स्थान देण्यात आले. यामुळे अनेकांच्या भावनांचा बांध फुटला आणि उपस्थितांमध्ये आनंदाश्रू दिसून आले.
सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध स्वरचित गीत गायिका कांताबाई शिंदे यांची उपस्थिती. त्यांनी समाजप्रबोधनात्मक गीतांच्या माध्यमातून उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले आणि माधुरी पवार यांच्या सामाजिक कार्याचा गौरव गीतांच्या माध्यमातून केला.
जानेफळ आणि परिसरातील ३५०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला, तर स्थानिक नागरिकांनीही कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पाठबळ दिले. हा सोहळा केवळ धार्मिक विधी न राहता सामाजिक एकात्मता, महिला सक्षमीकरण आणि सकारात्मक विचारांचा प्रतीक ठरला.
माधुरी पवार, देवानंद पवार फाउंडेशन आणि सखी रिसायकल्सच्या या यशस्वी आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Users Today : 13