बुलढाणा प्रतिनिधी –
बुलढाणा, दि. 26 – देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, विभाग प्रमुख, स्वातंत्र सेनानी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबोधित करताना सांगितले की, भारत हा प्रगती, परिवर्तन आणि आत्मविश्वासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. “आज प्रत्येक भारतीयाने ‘विकसित भारत’ चा संकल्प करण्याचा क्षण आहे. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून, त्याचबरोबर जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक राष्ट्र बनला आहे. हे यश कोट्यवधी भारतीयांच्या प्रामाणिक श्रमांचे फळ आहे. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन मानले जाते आणि बुलढाणा जिल्हाही या विकास मार्गावर आत्मविश्वासाने पुढे जात आहे,” असे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी शेती, उद्योग, शिक्षण, सहकार, डिजिटल सेवा, महिला सक्षमीकरण आणि युवक विकास या क्षेत्रांतील जिल्ह्याच्या उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकला. तसेच बुलढाणा पोलिसांनी ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत गुन्हेगारीत 10 टक्के घट साधली असून 80 टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळाले, आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 अंतर्गत प्रतिबंधात्मक कार्यवाही प्रभावीपणे राबविली असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान, आरोग्य उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. तसेच 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल आणि त्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल, असा संकल्प त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केला.
मुख्य ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पोलीस दलाची परेड पाहणी करून मानवंदना दिली. यानंतर पोलीस, वन, महिला व बालविकास, शिक्षण विभागाच्या ९ शाळेतील १८०० विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायतीचे सादरीकरण केले. तसेच अंमली पदार्थ प्रतिबंध, लोणार सरोवराचे संरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लाभार्थ्यांना दाखले वाटप, पाणंद रस्ते खुले करणे, गावांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करणे, वनहक्क कायद्याअंतर्गत आदिवासी बांधवांना ५१७ वनपट्टे वाटप करणे आणि आयआयटी मुंबईच्या सहकार्याने लोणार सरोवराचे संशोधन इत्यादी महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस, जिल्हा परिषद, जिल्हा सैनिक कल्याण, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, नगरपरिषद बुलढाणा, नैसर्गिक आपत्ती विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
बुलढाणा: जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आत्मनिर्भर बुलढाणा’ घडवण्याचे आवाहन केले
0
9
5
5
4
5
Users Today : 3
Leave a comment