अखंड श्रद्धा
सिंदखेड राजा प्रतिनिधी :
राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेडराजा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे एक अतूट भावनिक नाते होते. विदर्भातील इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत अजितदादांनी सर्वाधिक वेळा भेट दिलेले शहर म्हणजे सिंदखेडराजा असल्याचे येथे आवर्जून सांगितले जाते.
राजमाता जिजाऊंच्या माहेर असलेल्या या ऐतिहासिक नगरीच्या विकासासाठी अजितदादांनी विशेष लक्ष दिले होते. शहरातील विविध विकासकामांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असून, जिजाऊ जन्मस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
काही वर्षांपूर्वी सिंदखेडराजा दौऱ्यावर असताना अजितदादांनी तब्बल सात तास शहरातील ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली होती. त्यानंतर मुंबई मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेऊन जिजाऊ जन्मस्थळ विकासाबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभागासह संबंधित यंत्रणांनाही तात्काळ कार्यवाहीचे आदेश त्यांनी दिले होते.
अॅड. नाझेर काझी यांचे भावनिक स्मरण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून शेवटपर्यंत अजितदादांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्या दुःखद प्रसंगी स्वतः अजितदादांनी फोन करून त्यांचे सांत्वन केले होते.
परंतु त्यानंतरच अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच अॅड. काझी भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासाबाबत ते नेहमीच अजितदादांशी चर्चा करत असत. अजितदादाही ती संपूर्ण माहिती लक्षपूर्वक ऐकून तात्काळ अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश देत असत.
सिंदखेडराजाच्या विकासाला मोठा धक्का
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे जिजाऊंच्या या ऐतिहासिक नगरीच्या विकासाला मोठा धक्का बसल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. “जिजाऊंच्या नगरीसाठी झपाटून काम करणारा नेता हरपला,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.
आज संपूर्ण सिंदखेडराजा शहर अजितदादांच्या आठवणींनी गहिवरले असून, त्यांच्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहील, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
अजितदादांच्या आठवणींनी सिंदखेडराजा गहिवरला विदर्भात सर्वाधिक भेट दिलेले शहर; जिजाऊंच्या चरणी अखंड श्रद्धा
0
9
5
5
4
6
Users Today : 4
Leave a comment