मलकापूर, (प्रतिनिधी) :
लग्नानंतर पती-पत्नीमध्ये निर्माण होणारे वाद थेट न्यायालयात न नेता संवाद, समजूत आणि समुपदेशनाच्या माध्यमातून सोडवता यावेत, या सामाजिक हेतूने मलकापूर येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान व अकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ यांच्या संयुक्त पुढाकारातून *‘मराठा पंचायत समिती’*ची स्थापना करण्यात आली आहे. हा उपक्रम समाजात सुसंवाद, संयम आणि कौटुंबिक संस्कार पुनर्स्थापित करणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
आज अनेक कुटुंबे कौटुंबिक वादांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहेत. वर्षानुवर्षे चालणाऱ्या खटल्यांमुळे वेळ, पैसा आणि मानसिक शांतता खर्ची पडत असून अनेकदा नाती तुटतात; मात्र न्याय दूरच राहतो. या वास्तवाला पर्याय निर्माण करण्यासाठीच मराठा पंचायत समितीची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या समितीच्या अध्यक्षपदी दिलीप देशमुख यांची निवड करण्यात आली असून, सचिव म्हणून अॅड. साहेबराव एस. मोरे जबाबदारी पार पाडणार आहेत. समितीत समाजातील अनुभवी, विश्वासार्ह व संवेदनशील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. सदस्य म्हणून हरिभाऊ पाटील (भगत), ज्ञानदेवराव हिवाळे (गुरुजी), प्रकाश पाटील, सदाशिव भोईटे, सोपान शेलकर व निवृत्ती फरपट यांचा समावेश आहे.
समाजातील ज्या कुटुंबांमध्ये पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाले असतील, त्यांनी न्यायालयाचा मार्ग स्वीकारण्यापूर्वी मराठा पंचायत समितीकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज शिवराय मंगल कार्यालय येथे निवृत्ती फरपट यांच्याकडे विहित नमुन्यात सादर करता येणार आहेत. त्यानंतर समिती समुपदेशन व मध्यस्थीच्या माध्यमातून समतोल आणि न्याय्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
हा उपक्रम केवळ वाद मिटवणारा नसून, समाजात संयम, संवाद, कुटुंबसंस्कार आणि सामाजिक जबाबदारीची नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महत्त्वाचे म्हणजे समितीच्या स्थापनेच्या पहिल्याच दिवशी एका पती-पत्नीमधील वाद दोन्ही पक्षांच्या सहकार्याने आणि समंजस संवादातून यशस्वीरीत्या मिटवण्यात आला. ही घटना समाजासाठी आशादायी व प्रेरणादायी ठरत असून, मराठा पंचायत समितीच्या कार्याची परिणामकारकता अधोरेखित करणारी आहे.
Users Today : 6