वाशीम प्रतिनिधी :
जगातील विविध देशांच्या लोकशाहीचा इतिहास पाहिला असता असे दिसून येते की अनेक राष्ट्रांमध्ये नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी दीर्घ संघर्ष करावा लागला. अनेक ठिकाणी हा अधिकार केवळ काही मोजक्या घटकांपुरताच मर्यादित होता. त्यामुळे मतदानाचा अधिकार किती मौल्यवान आहे, याची जाणीव या इतिहासातून होते. मात्र भारतात स्वातंत्र्यानंतर जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक स्थितीचा भेद न करता प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा समान अधिकार देण्यात आला. हेच भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य असून, त्यामुळेच लोकशाहीचा पाया भक्कम झाला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
१६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाही अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने वाशीम येथे विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मतदान प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), पर्यवेक्षक तसेच रांगोळी व पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी धनाजी तोरस्कर, तसेच तहसीलदार निलेश पळसकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, मतदार नोंदणी व मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असून लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारीने कार्य केले पाहिजे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही अशीच कामगिरी अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मतदार नोंदणीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच रांगोळी व पोस्टर स्पर्धांद्वारे मतदान जनजागृतीचा प्रभावी संदेश देणाऱ्या विजेत्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी विलास भालेराव व सहकारी कलाकारांनी सादर केलेल्या मतदार प्रबोधनपर भारूडाने तसेच एनसीसी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी केले. संचालन महेश देवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी महाले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रवी महाले, अजय बांडे, शंकर कानडे तसेच नेहरू युवा केंद्राचे समन्वयक प्रदीप पट्टेबहादूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
मतदान जनजागृतीतूनच लोकशाहीचा पाया मजबूत होतो
0
9
7
3
9
7
Users Today : 16
Leave a comment