चिखली प्रतिनिधी :
शेतकरी केवळ पारंपरिक शेतीपुरते मर्यादित नसून जागतिक दर्जाचे उद्योजक बनू लागल्याचे उदाहरण म्हणजे चिखली तालुक्यातील कोनद खुर्द येथील आभाळमाया अॅग्रो. नुकतेच आशियाई विकास बँकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने या फळप्रक्रिया उद्योगाला भेट देऊन पाहणी केली.
१९ जानेवारी रोजी झालेल्या या भेटीदरम्यान पथकप्रमुख किष्णा रौतेला, मॅग्नेट प्रकल्पप्रमुख विनायक कोकरे, वरिष्ठ अन्न व पोषण तज्ज्ञ टोमोको काटो, हवामान बदल तज्ज्ञ उन्नीकृष्णन डी. नायर, तसेच गोविंद देसाई, ब्रँडो एम. एंजेलिस, सुमीत राठोड यांचा समावेश होता. त्यांनी प्रकल्पाची उभारणी, प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया आणि भविष्यातील बाजारपेठ याबाबत सविस्तर चर्चा केली.
या प्रकल्पाच्या यशामागे राजीव जावळे यांच्या दूरदृष्टी व कठोर परिश्रम कारणीभूत आहेत. पाहणीवेळी त्यांनी सांगितले की, या युनिटमध्ये दररोज सुमारे १६० क्विंटल फळांवर प्रक्रिया केली जाते. आंबा, जांभूळ, डाळिंब, पेरू आणि सीताफळ यांसारख्या फळांपासून उच्च दर्जाचे गर, पल्प आणि फ्रोजन उत्पादने तयार केली जातात. या प्रक्रियेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना हमखास भाव मिळतो तर रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतात.
आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने प्रकल्पातील गुणवत्ता नियंत्रण, साठवणूक व्यवस्था आणि बाजारपेठ जोडणी यांचे विशेष कौतुक केले. या प्रकल्पाला शाश्वत शेती, हवामान बदल अनुकूलन व शेतकरी सशक्तीकरण यासाठी आदर्श मानले गेले. शिष्टमंडळाने स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पाहणीवेळी मॅग्नेट प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी व कृषी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये अमरावती विभाग उपसंचालक मिलिंद जोशी, प्रकल्प उपसंचालक मंगेश कदम, प्रकल्प अधिकारी सचिन खरमाळे, वृंदा वजे, संस्कृती पाटील, रिद्धी धुमाळ यांचा समावेश होता.
राजीव जावळे यांनी मॅग्नेट प्रकल्पातून मिळालेल्या शासकीय मदतीचा प्रभावी वापर करून उद्योग उभा केला असून, या यशामुळे चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे व भविष्यात मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Users Today : 17