बुलढाण्यातील समस्यांच्या निराकरणासाठी बैठा सत्याग्रह ५७ दिवसांनंतरही प्रशासनाकडून दखल नाही; नागरिकांचा गांधी पुतळ्यासमोर निषेध

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

बुलढाणा शहरात उद्भवलेल्या विविध नागरी समस्यांबाबत प्रशासनाकडे निवेदन सादर करून तब्बल ५७ दिवस उलटूनही कोणतेही ठोस निराकरण न झाल्याने, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अॅड. प्रवीण सुरडकर यांच्या नेतृत्वात शहरातील नागरिकांनी ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बैठा सत्याग्रह केला.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बुलढाणा शहरात अनेक मूलभूत समस्या निर्माण झाल्या असून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. रविवारच्या आठवडी बाजारानंतर तात्काळ, म्हणजेच रविवारी रात्रीच साफसफाई करण्यात यावी, बाजारामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
शहरातील जुनी नळयोजना बंद करून नवीन नळजोडण्या देताना करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी. तसेच नवीन नळजोडणीच्या पाइपलाईनमध्ये अनेक ठिकाणी लिकेजेस असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे, त्यामुळे सदर लिकेजेस तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. रहिवासी भागातील साफसफाईकडेही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद आहे.
याशिवाय बुलढाणा–मलकापूर रस्त्यालगत तीन ते पाच ठिकाणी ३ बाय २ आकाराचे खड्डे खोदून ठेवलेले असून, चैतन्यवाडी व तिवारी वाड्याजवळही अशाच प्रकारचे खड्डे आढळून येतात. यामुळे नागरिकांना अपघात, शारीरिक इजा किंवा जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे सत्याग्रहकर्त्यांनी नमूद केले.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व हुतात्मा दिनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा बैठा सत्याग्रह करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जर सदर समस्यांचे तात्काळ निराकरण झाले नाही, तर यापुढे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सत्याग्रहात सहभागी कार्यकर्त्यांनी दिला.
या आंदोलनात अॅड. प्रवीण सुरडकर, अॅड. गुणवंत नाटेकर, अॅड. अमोलकुमार गवई, अॅड. अक्षय तोत्रे, अॅड. राम अंभोरे, अॅड. पी. बी. नरोटे, भागवत राजपूत, अॅड. मदन मगर, अॅड. राहुल मोरे, अॅड. राहुल तायडे आदी सहभागी झाले होते.

0 9 5 5 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *