देऊळगाव मही : पैठण नगरपालिकेत अनिता वीर यांची नगरसेवकपदी निवड होणे देऊळगाव महीसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण ठरला आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात समाधन शिंगणे यांच्या हस्ते अनिता वीर यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर, माजी सरपंच रामकिसन म्हस्के, वंदना शिंगणे, अनंथा़ इंगळे तसेच ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम पंडित, संदीप राऊत, अनिल शिंगणे आणि सै वाहेद आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मान समारंभात बोलताना समाधन शिंगणे यांनी म्हणाले, “हा क्षण केवळ आनंदाचा नसून अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. या मातीत जन्म घेतलेली आपली लेक आज पैठण नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आली आहे, ही बाब संपूर्ण देऊळगाव महीसाठी सन्मानाची आहे. सामान्य कुटुंबातून येऊन, कोणताही गाजावाजा न करता प्रामाणिकपणा, जिद्द आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ ठेवत अनिता वीर यांनी हे यश संपादन केले आहे. ही निवड केवळ एका व्यक्तीची नसून देऊळगाव महीच्या प्रत्येक लेकीची, प्रत्येक आई-बहिणीची विजयघोषणा आहे.”
मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर यांनीही अनिता वीर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी पैठण शहराच्या सर्वांगीण विकासात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण तसेच महिला व युवक सशक्तीकरण या क्षेत्रांत अनिता वीर भरीव कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांच्या वतीने अनिता वीर यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे यश सुनिश्चित करण्यासाठी गजानन पंडित, दीपक पंडित आणि केशव पंडित यांनी विशेष सहकार्य केले.
Users Today : 6