बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी):
कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी जोड न्यायालय–दुसरे बुलढाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी मंदार पी. पांडे यांनी आरोपीस तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ३१ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
बुलढाणा येथील सुवर्ण नगर परिसरातील शिवसाई नागरी सहकारी पतसंस्थेकडून चंदन फकीरा पसरटे (रा. बुलढाणा) यांनी कर्ज घेतले होते. कर्जाची नियमित परतफेड न केल्याने संबंधित कर्ज खाते एनपीएमध्ये गेले. त्यानंतर पतसंस्थेने वसुलीची कार्यवाही सुरू करत थकीत रकमेची मागणी केली असता, आरोपीने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतीय स्टेट बँक, सुंदरखेड शाखेचा २१ लाख रुपयांचा (धनादेश क्र. ६४२२७२) धनादेश दिला.
हा धनादेश पतसंस्थेमार्फत बँकेत सादर केला असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित झाला. त्यानंतर पतसंस्थेच्या वतीने आरोपीस कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली. मात्र, विहीत मुदतीत रक्कम अदा न केल्याने पतसंस्थेचे वसुली अधिकारी रमेश देशमुख यांनी न्यायालयात संक्षिप्त फौजदारी खटला (एसएससी नं. १०९१/२०२१) दाखल केला.
प्रकरणातील सर्व साक्षी व पुरावे तपासून न्यायालयाने २८ जानेवारी २०२६ रोजी निकाल देताना आरोपी चंदन फकीरा पसरटे यांना परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अन्वये दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीस तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ३१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
वसूल झालेली दंडाची रक्कम फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम ३५७ (१)(ब) नुसार फिर्यादी पतसंस्थेस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. आरोपी शिक्षा सुनावताना गैरहजर असल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१८ (२) अन्वये त्याच्याविरुद्ध शिक्षेचे अधिपत्र काढण्याचे आदेश देण्यात आले.
या प्रकरणात फिर्यादी पतसंस्थेतर्फे अॅड. उदय संतोष कारंजकर यांनी कामकाज पाहिले, तर फिर्यादी म्हणून रमेश साहेबराव देशमुख यांनी प्रकरण हाताळले.
Users Today : 4