महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे : प्रतिभा भुतेकर चर्मकार समाजाचा पहिला महिला मेळावा उत्साहात संपन्न

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी)
अंधश्रद्धा स्त्रियांच्या जीवनात खोलवर भिनलेली असून त्यामुळे त्यांच्या प्रगतीला अडथळे निर्माण होत आहेत. आधुनिकतेची कास धरत महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा भुतेकर यांनी केले.

स्थानिक गुरु रविदास सामाजिक भवन, बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ मॉ साहेब, सावित्रीबाई फुले, गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त तसेच आयर्न लेडी बहन मायावती यांच्या जन्मदिनानिमित्त चर्मकार समाजाचा पहिला महिला मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात प्रतिभा भुतेकर प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेखा अरविंद राजूस्कर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून नंदाताई खरात उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. प्रास्ताविक प्रा. डी. आर. माळी यांनी केले. यावेळी मायाताई पद्मने यांनी महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित न राहता आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा, असे मत व्यक्त केले. अॅड. सविता चांदोरे यांनी महिलांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे व अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

नंदाताई बडगे यांनी समाजकार्यासाठी लेकी व सुनांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली. विमल शिराळे, डॉ. सुनिता खर्डे यांच्यासह इतर महिलांनीही आपले विचार मांडले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेखा राजूस्कर यांनी महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहावे, समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा आणि स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. यावेळी भीमसेन शिराळ यांनी महिलांसाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा आयोजित करून योग्य उत्तरे देणाऱ्यांना ग्रंथ भेट दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. वर्षा मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरु रविदास उत्सव समितीने सहकार्य केले.

0 9 2 6 4 4
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *