बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी) –
आजच्या डिजिटल युगात मोबाईलपासून काही काळ दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगणे, स्वावलंबनाचे धडे गिरवणे आणि जीवनकौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले.
शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) तसेच भारत स्काऊट-गाईड, बुलढाणा कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सैनिक शाळा, कोलवड येथे आयोजित जिल्हा स्काऊट-गाईड मेळाव्याचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसाई ज्ञानपीठचे अध्यक्ष डी. एस. लहाने उपस्थित होते.
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित तीन दिवसीय मेळाव्यात बुलढाणा जिल्ह्यातील १,२१७ स्काऊट-गाईड, स्काऊटर-गाईडर व स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. यावेळी डॉ. अभिलाष माळी, प्रा. डी. एस. लहाने आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या उद्घाटन कार्यक्रमाला नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी शेख अकिल इब्राहिम, शिक्षण विस्तार अधिकारी उमेश जैन, राष्ट्रीय सैनिक शाळेच्या अध्यक्षा विद्याताई माळी, विश्वनाथ माळी, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, शिवाजी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ, भारत स्काऊट-गाईडचे माजी अध्यक्ष नितीन शिंगणे, सुनील जंवजाळ, सुभाष श्रीराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या तीन दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांसाठी लोकनृत्य, शेकोटी (कॅम्प फायर), तंबू सजावट, गाठींचे प्रकार, शारीरिक प्रात्यक्षिके, शोभायात्रा, बिनभांड्याचा स्वयंपाक, गॅझेट्स, प्रथमोपचार व पथसंचलन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, धाडसी वृत्तीचा तसेच निसर्गनिवासाशी संबंधित सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.
मेळाव्याचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हा मुख्य आयुक्त विकास पाटील, जिल्हा आयुक्त अनिल अकाळ, सचिव जगन मुंढे, मेळावा प्रमुख आर. यू. शिंगणे, जिल्हा संघटक (स्काऊट) सुधाकर साखरे व गाईड संघटक कविता पवार यांनी केले आहे. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी भारत स्काऊट-गाईड बुलढाणा कार्यालयातील कर्मचारी, तसेच जिल्हाभरातून आलेले स्काऊटर-गाईडर, स्काऊट व गाईड मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
Users Today : 11