बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी)
वारंवार सूचना व आवाहन करूनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने कठोर पावले उचलली असून, जानेवारी महिन्यात अकोला परिमंडळातील तब्बल ६ हजार ३८७ ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. या कारवाईमुळे थकबाकीदार ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कनेक्शन कापण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक संख्या बुलढाणा जिल्ह्यातील असून, येथे ४ हजार ३५२ ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली आहे. याखालोखाल अकोला जिल्ह्यातील १ हजार ३२१ आणि वाशीम जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे.
अकोला परिमंडळाअंतर्गत वाढत्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे. “वीजबिल भरणार नाही, तर वीजही मिळणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत थकबाकीदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. महावितरणची कठोर कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी तात्काळ थकीत वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.
आकडेवारीनुसार अकोला जिल्ह्यातील ४ लाख १६ हजार ३३७ ग्राहकांकडे १२६ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी असून त्यापैकी ४६ कोटी ४५ लाख रुपये वसूल झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ५ लाख २९ हजार ६८२ ग्राहकांकडे १५९ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी असून ४६ कोटी ३१ लाखांची वसुली झाली आहे. वाशीम जिल्ह्यातील २ लाख २१ हजार १६३ ग्राहकांकडे ५८ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी असताना जानेवारी महिन्यात केवळ १८ कोटी ९५ लाख रुपयांचीच वसुली झाली आहे.
११ लाखांहून अधिक थकबाकीदार
अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील एकूण ११ लाख ६७ हजार १८२ ग्राहकांकडे जानेवारी महिन्याचे चालू बिल वगळता तब्बल ३४५ कोटी रुपयांची थकबाकी होती. यापैकी जानेवारी महिन्यात ११२ कोटी रुपयांची वसुली झाली असून अद्याप २३३ कोटी रुपये थकीत आहेत.
वारंवार आवाहन करूनही अनेक ग्राहकांकडून वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, पुढील काळात कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Users Today : 11