बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी)
ज्ञानगंगा फॉरेस्ट ग्रुप बुलढाणा व रणरागिणी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी राधेश्याम चांडक यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धावपटूंचाही शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड, नितीन चौधरी, अॅड. शरद राखोंडे, महेश महाजन, संदीप शेळके, डॉ. अश्विनी जाधव, प्रशिक्षक प्रशांत राऊत, रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दक्षिण कोरिया येथे आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केलेले अॅड. शरद राखोंडे, संदीप शेळके, प्रशांत राऊत व डॉ. अजित घुले, तसेच गोवा येथे अर्ध आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे विराज महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच मिलिंद सोमन आयोजित पिंक कॅथलॉन १०२ किलोमीटर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या डॉ. अश्विनी जाधव, इंडिया–पाकिस्तान बॉर्डर रन (१०० किमी) पूर्ण केलेले बालाजी नारागुडे, संतोष जाधव व सुधीर कुलकर्णी यांचा सहकार महर्षी राधेश्याम चांडक व आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बुलढाण्याचे कॉम्रेड रनर नितीन चौधरी यांचे स्वागत व सत्कार कॉम्रेड रनर महेश महाजन व राधेश्याम चांडक यांनी केले.
याप्रसंगी राधेश्याम चांडक व आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. बुलढाण्यात अधिकाधिक गुणवत्तापूर्ण खेळाडू घडावेत यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार गायकवाड यांनी दिले.
१ मार्च रोजी फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन
बुलढाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर ग्रुपतर्फे १ मार्च २०२६ रोजी फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राधेश्याम चांडक व आमदार संजय गायकवाड यांनी केले. यावेळी टाटा मुंबई मॅरेथॉन–२०२६ मध्ये सहभागी झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व धावपटूंचेही स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानगंगा ग्रुपचे रवींद्र पाटील, किरण तायडे, स्वप्निल देवकर, सचिन गाढवे, महेंद्र सौभागे, बापूसाहेब गाढे तसेच रणरागिणी क्लबच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. शरद राखोंडे व रवींद्र पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वाती शेळके यांनी केले.
Users Today : 11