कामगार-कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपात सहभागी व्हावे : गायकवाड

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी)
भांडवलधार्जिण्या सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय स्तरावर सीटूसह विविध प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय देशव्यापी संपात बुलढाणा जिल्ह्यातील कामगार व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांनी केले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने कामगार हिताचे २९ कामगार कायदे रद्द करून कोणतीही व्यापक चर्चा न करता चार श्रमसंहिता बहुमताच्या जोरावर संसदेत संमत केल्या असून त्यांच्या अंमलबजावणीचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. या चार श्रमसंहितांमुळे देशातील कामगारांची सुरक्षितता व हक्क मोठ्या प्रमाणात धोक्यात येणार असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.

तसेच १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कामगार-कष्टकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. आरोग्य, शिक्षण तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करून महागाई नियंत्रणासाठी उपाययोजना नसल्याने कामगार वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महिला कामगारांसह विविध घटकांनी १२ फेब्रुवारीच्या देशव्यापी एकदिवसीय संपाला पाठिंबा जाहीर केला आहे.

या संदर्भात २ फेब्रुवारी रोजी सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सचिव प्रतिभा पाटील, गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव जयश्री तायडे, रेखा इंगळे, अर्धवेळ परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्ष छाया खंडारे, शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष शोभा काळे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे तसेच नर्मदा शिरसाट, सुरेखा डोंगरे, सुरेखा गायकवाड, छाया जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 2 6 4 4
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *