भोन येथील प्राचीन बौद्ध स्तूपाचा शोध घेणारे प्रा. डॉ. बी.सी. देवतारे यांचा ६ फेब्रुवारीला बुलढाण्यात नागरी सत्कार

Khozmaster
3 Min Read

बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भोन गावात २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांनी विकसित केलेल्या प्राचीन शहर व बौद्ध स्तूपाचे उत्खनन करून बुलढाणा जिल्ह्याला जागतिक ओळख मिळवून देणारे पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी.सी. देवतारे यांचा नागरी सत्कार मंगळवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बुलढाणा येथील गोवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्यावर हा जाहीर सत्कार व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रा. डॉ. देवतारे यांनी २००३ ते २००७ या कालावधीत पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या प्राचीन भोन गावाचे उत्खनन केले. संशोधनातून भोन हे एकेकाळी संपन्न शहर असून दक्षिण व उत्तर जंबूद्वीपाला जोडणारी महत्त्वाची बाजारपेठ असल्याचे स्पष्ट झाले आहे. मौर्य काळात सम्राट अशोक यांनी या शहराचा विकास करून येथे बौद्ध स्तूपाची निर्मिती केल्याचे पुरावे उत्खननात आढळले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्हा ऐतिहासिक व प्राचीन वारसा लाभलेला असल्याचे सिद्ध झाले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास लेखक व विचारवंत प्रा. रवींद्र इंगळे चावरेकर, नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, इतिहास संशोधक प्रा. डॉ. श्याम देवकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, दिशा अर्बनच्या अध्यक्षा अॅड. जयश्रीताई शेळके, वकील संघाचे जिल्हाध्यक्ष विजय सावळे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन, लेखिका प्रा. डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे, जामा मस्जिदचे इमाम हाफिज रहमत खान, सामाजिक कार्यकर्त्या शाहीना पठाण आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

भोन येथील उत्खननाचा सविस्तर अहवाल बंगळुरु येथील एका नामांकित संस्थेने प्रकाशित केला असून तो सार्वजनिक झाला आहे. ही बाब बुलढाणा जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद आहे. प्रा. डॉ. देवतारे यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना भारतीय पुरातत्त्व विभागाचे जनक मेजर जनरल सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात भारतातील प्रसिद्ध इतिहासकार, विचारवंत व लेखक प्रा. डॉ. विलास खरात यांचे जाहीर व्याख्यान तसेच त्यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. स्तूपावरील संशोधन जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.

या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त उपासिका संघ व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजक कुणाल पैठणकर, प्रा. राजेश खंडेराव, अॅड. राहुल दाभाडे, सुरेश डवरे, आत्माराम चौतमोल, भिकाजी मेढे, मोनिका साळवे, प्रशांत बोर्ड, संजय जाधव, सुरेश घेवंदे, सुरेश सरकटे, प्रा. प्रदीप जाधव, सारिका घेवंदे, सिद्धार्थ आराख, गणेश झोटे, पद्माकर डोंगरे, प्रल्हाद कांबळे यांनी केले आहे.

0 9 2 6 4 4
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *