बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी) :
परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थीही आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच यश संपादन करू शकतात, असा विश्वास धनुर्विद्येतील सुवर्णपदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश जावकर यांनी व्यक्त केला.
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ आज स्थानिक जिजामाता क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात झाला. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जागतिक पातळीवरील धनुर्विद्या सुवर्णपदक विजेते खेळाडू शुभम जावकर व मिहीर अपार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी मंचावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाखळे, प्रमोद एंडोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, गटविकास अधिकारी समाधान वाघ, अशोक काळे, हिवाळे तसेच जिल्हा परिषदेचे विविध खातेप्रमुख व पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्रथमेश जावकर म्हणाले की, क्रीडा क्षेत्रातील यश हे कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यावर अवलंबून असते. मात्र आत्मविश्वास हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. पराभवाने खचून न जाता प्रत्येक स्पर्धेतून अनुभव घेत पुढील तयारी करणे गरजेचे आहे. प्रशिक्षक व सहकारी खेळाडूंच्या पाठबळामुळेच आपल्याला यश मिळाले, असे सांगत विद्यार्थ्यांमधून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय मनोगतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना जिल्हास्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषद दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करीत असल्याचे सांगितले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये समन्वय, संवाद व कौशल्य विकास साधला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, क्रीडा ज्योत प्रज्वलन व क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली उबरहंडे यांनी केले.जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील १,००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कबड्डी, खो-खो व धावण्याच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले क्रीडा कौशल्य सादर केले.
Users Today : 8