बुलढाणा, दि. ३ (प्रतिनिधी) :
समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आले आहे. हे काम वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील विविध टप्प्यांवर ७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान करण्यात येणार असून, यासाठी महामार्गावरील वाहतूक एकूण ३५ टप्प्यांत काही काळासाठी बंद ठेवली जाणार आहे.
समृद्धी महामार्गावरील किमी १७८+९०० ते २९०+४०० या दरम्यान, वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड), मंगरुळपीर, मालेगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या मार्गावर गॅन्ट्री उभारणीचे काम होणार आहे.
या कामासाठी संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक तत्काळ सुरू करण्यात येईल, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
महामार्गावर मुंबई व नागपूर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर ठराविक वेळेत परिणाम होणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच प्रवासाचे नियोजन करूनच मार्गक्रमण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालकांनी वाहतूक पोलीस, महामार्ग प्रशासन तसेच सूचना फलकांचे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
कामाचे वेळापत्रक जाहीर
७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध तारखांना रात्री १२ ते १ वाजेपर्यंत तसेच दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत, मुंबई व नागपूर वाहिनीवर पुढील ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
महामार्गावरील किमी क्रमांक पुढीलप्रमाणे :
१७८.९००, १७९.७५०, १८३.७००, १८५.५००, १९०.४००, २००.४००, २०५.४००, २०८.२००, २०८.८५०, २३८.५५०, २४२.६००, २४५.४००, २५०.५००, २६०.४००, २६४.८००, २७०.४००, २८०.४००, २८१.४०० व २८३.९००.
या सर्व ठिकाणी काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक काही काळासाठी बंद राहणार आहे.
Users Today : 8