कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहा | गुलाबराव खरात यांचे प्रतिपादन : जि.प. सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात समारोप : बुलढाणेकर रसिकांचा भरगच्च प्रतिसाद

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात सादर झालेली कला सादरीकरणे ही व्यावसायिक दर्जाची असून यापुढेही सर्व कर्मचाऱ्यांनी कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप गुरुवारी रात्री उत्साहात पार पडला. यावेळी ते समारोप कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या सुविद्य पत्नी रिपिका खरात, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे सदस्य सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, सतीश देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ तसेच जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख व तेराही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुटुंबासह उपस्थित होते.


विविध कला प्रकारांचे बहारदार सादरीकरण

दि. ४ व ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडलेल्या या सांस्कृतिक महोत्सवात भावगीत, भक्तीगीत, लोकगीत, सिनेगीत, युगलगीत, कॅरीओकी, एकल नृत्य, समूह नृत्य, हास्य जत्रा अशा विविध कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.

जिल्हा परिषद मुख्यालयासह तेराही पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांनी या महोत्सवात सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थित रसिकांची मने जिंकली.


बुलढाणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

या महोत्सवाला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह बुलढाणा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. नागरिकांची भरगच्च उपस्थिती ही महोत्सवाच्या यशाचे ठळक उदाहरण ठरली.


सीईओंनी रंगवली तबलावादनाची जुगलबंदी

दरम्यान, समारोपाच्या रात्री मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी तबलावादन करून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. बँजोच्या साथीने त्यांनी त्रिताल व केरवातील सुंदर बोल सादर करत नटरंग मधील धूनवर सुरेख जुगलबंदी रंगवली. त्यांच्या वादनाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.

0 9 4 0 5 5
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *