शेगाव, दि. ७ (बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी):
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान संतनगरी शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्याचे आयोजन संत गजानन महाराजांच्या पावन नगरीत होत असून, या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री मकरंद पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगारमंत्री आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा व आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रा. राकेश शर्मा यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
आयोजनाची जबाबदारी आयुर्वेद महासंमेलनाकडे
या राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्याकडे सोपविण्यात आले असून, ही संस्था १९०७ साली त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) येथे स्थापन झालेली देशातील सर्वांत जुनी व मोठी आयुर्वेदिक संघटना आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. आशुतोष गुप्ता यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महासंमेलनाने यापूर्वी २२ राज्यस्तरीय व ३ राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे यशस्वीरीत्या आयोजित केले आहेत.
चार दिवस मोफत तपासणी व उपचार
या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योग या आयुष चिकित्सा पद्धतींचा जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसार करण्याचा उद्देश आहे.
२५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान दररोज नागरिक व रुग्णांची आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी वनऔषधी लागवडीचे मार्गदर्शन
या मेळाव्याचा लाभ बुलढाणा जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार असून, वनऔषधी लागवड व त्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वनऔषधी लागवड करून उत्पन्नवाढीची संधी साधावी, असे आवाहन ना. जाधव यांनी केले.
औषध उत्पादकांसाठी कार्यशाळा व प्रदर्शन
या मेळाव्यात देशभरातील आयुष औषध निर्माता कंपन्या सहभागी होणार असून, त्यांच्यामार्फत गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (GMP), तसेच आयुर्वेद क्षेत्रातील नवीन संशोधन याबाबत माहिती दिली जाणार आहे. औषध उत्पादकांसाठी स्वतंत्र कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय, वनऔषधी प्रदर्शन आयोजित करून सामान्य नागरिकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध वनऔषधींच्या सहाय्याने कमी खर्चात उपचार कसे करता येतात, याची माहिती दिली जाणार आहे.
आयुष मंत्रालयाच्या उपक्रमांची माहिती
आयुष मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना ना. जाधव यांनी सांगितले की, ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान’ अंतर्गत १.३९ कोटी लोकांनी सहभाग नोंदवला असून, फेब्रुवारी २०२५ मध्ये ५ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात आले.
तसेच डिसेंबर २०२५ मध्ये दिल्ली येथे पारंपरिक औषधोपचारांवरील दुसरी जागतिक शिखर परिषद पार पडली, तर जून २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले.
आयुष औषधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्रे सुरू करण्याचा मानस असून, आयुष्मान भारत योजनेत आयुष पॅकेजेसचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी लाभ घ्यावा – ना. जाधव
या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचा लाभ जिल्ह्यातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन ना. प्रतापराव जाधव यांनी केले.
पत्रकार परिषदेस कामगारमंत्री आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, कार्यकारी अधिकारी अवधेश कुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
Users Today : 8