तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी ‘आपले सरकार’ पोर्टलवर करता येणार अर्ज

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा :
जिल्ह्यात नवीन तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी ५ मार्च २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडून ऑनलाइन नोंदणी अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यात तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादनासाठी अनुकूल वातावरण असून रेशीम उद्योगात सातत्याने वाढ होत आहे. तुती लागवडीमुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळत असून, एक एकर क्षेत्रातून दुसऱ्या वर्षापासून दोन लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते, असे दिसून येत आहे. रेशीम कोष उत्पादन वाढल्यामुळे जालना, बीड, बडनेरा, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. शासनाचे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण रेशीम उद्योगाद्वारे साध्य होत असल्याचे चित्र आहे.

मनरेगा अंतर्गत अनुदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी १ एकर तुती लागवड, जोपासना व कीटक संगोपन गृहासाठी तीन वर्षांत एकूण ८९५ मनुष्यदिवसांची मजुरी दिली जाते. यामध्ये मजुरीपोटी २ लाख ७९ हजार २४० रुपये व साहित्यासाठी १ लाख ५३ हजार रुपये, असे एकूण ४ लाख ३२ हजार २४० रुपये अनुदान देण्यात येते.

सिल्क समग्र २ योजनेंतर्गत अनुदान

केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र २ योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी प्रति एकर ५४ हजार, सिंचन संचासाठी प्रति एकर ५४ हजार, कीटक संगोपन गृहासाठी २ लाख ४३ हजार ७५०, संगोपन साहित्यसाठी ३७ हजार ५००, तसेच निर्जंतुकीकरण औषधांसाठी ३ हजार ७५० रुपये, असे एकूण ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान उपलब्ध आहे.
बहुभूधारक शेतकऱ्यांना या योजनेतून २ एकर तुती लागवड करता येऊन एकूण ५ लाख ६२ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते.

पोकरा योजनेतूनही लाभ

कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) अंतर्गत तुती लागवडीसाठी ४५ हजार, रेशीम कीटक संगोपन गृहासाठी २ लाख ४३ हजार ७५० व संगोपन साहित्यासाठी ३६ हजार ३७५ असे एकूण ३ लाख २५ हजार १२५ रुपये अनुदान देण्यात येते. बुलढाणा जिल्ह्यातील ३१० गावांमध्ये पोकरा योजना लागू असून इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ऑनलाइन अर्ज करावा.

मनरेगा व सिल्क समग्र २ योजनेसाठी नोंदणी व मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय (बुलढाणा) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी विजय ठाकरे यांनी केले आहे.

0 9 3 2 0 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *