बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी) :
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथे आज दुपारी २ वाजता समुपदेशन कक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
समुपदेशन कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कक्षाच्या माध्यमातून न्यायालयात प्रलंबित असलेले कौटुंबिक वाद तसेच विविध दिवाणी वाद तडजोडीच्या मार्गाने निकाली काढण्यास मदत होणार आहे. न्यायालयीन तणाव कमी करून परस्पर संवादातून तोडगा काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्यास हातभार लागणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे जेलमध्ये बंदिस्त असलेल्या बंद्यांशी न्यायालयातून थेट संपर्क साधता येणार असून, तालुकास्तरीय न्यायालयात उपस्थित असलेल्या साक्षीदारांची साक्ष देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविता येणार आहे. या आधुनिक सुविधेमुळे न्यायप्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित तसेच खर्चिक बाबींमध्ये बचत करणारी ठरणार आहे.
कार्यक्रमास विजय सावळे (अध्यक्ष, वकील संघ, बुलढाणा), सर्व न्यायाधीश, डॉ. लता बाहेकर (विधीज्ञ) तसेच न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन एन. पाटील (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा) यांनी विशेष परिश्रम घेतले.
Users Today : 16