खामगाव, दि. १३ (प्रतिनिधी)
तालुक्यातील चितोडा येथे हातभट्टी दारू तयार करून तिची साठवणूक केल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुळमिश्रित मोहसडवा व साहित्य जप्त केले आहे. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १३) दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास चितोडा येथे प्रेम कैलास तीडके (वय २७) याच्या ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान १५ लिटर क्षमतेचे १२ टिनपत्राचे डबे, ४ प्लास्टिक कॅन, गुळमिश्रित मोहसडवा, ५ लिटर हातभट्टी दारू, स्टीलचा हांडा, प्लास्टिक टब व इतर साहित्य असा सुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क, फ, ड, ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
दरम्यान, याच दिवशी सकाळी सुमारे ११.०५ वाजता पोलिसांनी चितोडा येथे गजानन राजाराम तीडके (वय ५०) यांच्या ठिकाणीही छापा टाकला. या कारवाईत १० प्लास्टिक कॅनमधील गुळमिश्रित मोहसडवा, २ टिनचे डबे, ८ लिटर हातभट्टी दारू, स्टीलचा हंडा, प्लास्टिक टब व अन्य साहित्य असा सुमारे ८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
Users Today : 5