बुलढाण्यात शिवजयंतीचा जल्लोष; शहरभर दणदणीत मिरवणुका

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
स्वराज्य निर्माते, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हाभर जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम आणि भव्य मिरवणुकांनी शहरात शिवशाही अवतरल्याचे चित्र दिसून आले.
सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे पूजन, दुग्धाभिषेक व पुष्पवृष्टी करण्यात आली. १६ ते १९ फेब्रुवारीदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकांमध्ये ढोलताशांचा गजर, लेझर शो, लाठी-काठीच्या चित्तथरारक कवायती आणि शिवगर्जना यामुळे वातावरण भारावून गेले.
विविध कार्यक्रमांची रेलचेल
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने १३ फेब्रुवारीला गडकिल्ले स्पर्धा, १४ फेब्रुवारीला पोवाडे व शिवगीत स्पर्धा, १६ फेब्रुवारीला वक्तृत्व, प्रश्नमंजुषा व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या.
१६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले.
१६ फेब्रुवारीला शाहीर देवानंद माळी व पृथ्वीराज माळी यांचा ‘शाहिरी शिवगर्जना’ कार्यक्रम झाला. १७ फेब्रुवारीला व्याख्याते वसंत हंकारे यांचे ‘न समजलेले आई-बाप समजून घेताना’ या विषयावरील व्याख्यान झाले. तसेच भजन संध्या व ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा लोककला कार्यक्रम पार पडला.
१८ फेब्रुवारीला सहकार विद्या मंदिर ते शिवस्मारक अशी शिवज्योत काढण्यात आली, तर रात्री लेझर शोने उपस्थितांची मने जिंकली. १९ फेब्रुवारीला शिवरायांचा पाळणा, समूहगान व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. शाहीर डी. आर. इंगळे यांच्या ‘शिव पहाट’ कार्यक्रमाने शिवचरित्राचा जागर केला.
‘झुलवा पाळणा… बाळ शिवाजीचा’
सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सुहासिनींनी दुग्धाभिषेक करून बाल शिवरायांचा पाळणा सादर केला. गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांनी पावली खेळत सादरीकरण केले. संत तुकाराम आणि विदूर यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले.
५१ तोफांची सलामी
१८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १९ फेब्रुवारीचे स्वागत ५१ रंगीत तोफांच्या सलामीने करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत विविध रंगांनी उजळून निघाला.
ढोलताशांचा दणदणाट आणि डीजेच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांनी शहरातील प्रमुख रस्ते व्यापले होते. शिवप्रेमींच्या अलोट गर्दीने बुलढाणा शहर उत्साहाने न्हाऊन निघाले.

0 9 5 5 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *