एसटी महामंडळाकडून ‘रुपे ऑन द गो’ (एनसीएमसी) वैयक्तिक कार्ड लवकरच सवलतीचे तिकीट, पास टॉप-अप व डिजिटल वॉलेट सुविधा एकाच माध्यमातून

KHOZ MASTER
3 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) बुलढाणा विभागामार्फत सर्व सवलतधारी व विनासवलतधारी प्रवाशांसाठी ‘रुपे ऑन द गो’ (एनसीएमसी) सक्षम वैयक्तिक कार्ड लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून सवलतीचे तिकीट, विविध पास टॉप-अप तसेच डिजिटल वॉलेट सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, हे वैयक्तिक कार्ड असून त्यावर कार्डधारकाचे नाव व छायाचित्र असेल. कार्ड अहस्तांतरणीय राहील. सवलतधारी तसेच सामान्य प्रवासी या कार्डचा वापर करू शकतील. कार्डमध्ये सवलत सुविधा, ऑनलाइन वॉलेट आणि ऑफलाइन वॉलेटचा समावेश असेल.
तिकीट व वॉलेट सुविधा
बस प्रवासादरम्यान सवलतीचे तिकीट काढण्यासाठी हे कार्ड अनिवार्य राहणार आहे.
ऑनलाइन वॉलेट : मोबाइल, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे टॉप-अप करता येईल. आरक्षण (मोबाइल अॅप/पीओआरएस) तसेच इतर व्यवहारांसाठी याचा वापर करता येईल.
ऑफलाइन वॉलेट : ऑनलाइन वॉलेटमधील रक्कम ऑफलाइन वॉलेटमध्ये हस्तांतरित करता येईल. बसमधील वाहकाद्वारे काढण्यात येणाऱ्या तिकीटासाठी ऑफलाइन वॉलेटचा वापर केला जाईल. सवलतीचे तिकीट घेण्यासाठी ऑफलाइन वॉलेटमध्ये अपेक्षित भाड्याइतकी शिल्लक असणे आवश्यक राहील.
नोंदणी व वितरण प्रक्रिया
कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया महामंडळाच्या २५१ आगारांतील अधिकृत एजंट, सुमारे ३३५ वाहतूक नियंत्रण कक्ष तसेच NSDL Payments Bank मार्फत नियुक्त सुमारे तीन हजार एजंट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. संबंधित तपशील परिशिष्ट ‘अ’ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे.
देखभाल शुल्क
वॉलेट टॉप-अपवर ०.९ टक्के सुविधा शुल्क तसेच वस्तू व सेवा कर आकारला जाणार आहे. विद्यार्थी, मासिक, त्रैमासिक व इतर सर्व पासेसचे टॉप-अप ५० रुपयांच्या पटीत करणे आवश्यक आहे. टॉप-अप सुविधा आगार, बसस्थानके, अधिकृत एजंट, संकेतस्थळ, मोबाइल अॅप तसेच वाहकाच्या ईटीआय मशीनद्वारे उपलब्ध राहील. आगार हद्दीबाहेरील एजंटमार्फत सेवा घेतल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
कार्ड किंमत
नवीन नोंदणी : १११ रुपये (सर्व करांसह)
पूर्वीच्या स्मार्टकार्डधारकांनी जुने कार्ड जमा केल्यास : १४९ रुपये
कार्ड हरवले/खराब झाल्यास : १९९ रुपये (ऑफलाइन वॉलेटमधील शिल्लक परत मिळणार नाही)
चुकीची छपाई किंवा तांत्रिक दोष असल्यास : विनामूल्य बदल
विविध सवलतींचा समावेश
या कार्डमध्ये शासनमान्य शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी पास, दिव्यांग पास, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना तसेच विविध पुरस्कारार्थी व विशेष श्रेणीतील प्रवाशांच्या सवलतींचा समावेश करण्यात येणार आहे.
कार्ड वितरण सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी लवकरात लवकर नोंदणी करून या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

0 9 5 5 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *