बुलढाणा, दि. २२ (प्रतिनिधी):
संत निरंकारी मिशन यांच्या विद्यमान सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात ‘प्रोजेक्ट अमृत’ या स्वच्छता अभियानांतर्गत विविध जलाशय, तलाव व जलप्रकल्प परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २२ फेब्रुवारी रोजी बुलढाणा शहरालगतच्या येळगाव धरण परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमातून ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ असा संदेश देण्यात आला. जल हे जीवनाचे आधारस्तंभ असल्याने ते स्वच्छ व पवित्र राखणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मनाची शुद्धताही तितकीच महत्त्वाची असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.
निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मिशनचे तत्कालीन सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी जगभरात स्वच्छता अभियान आयोजित केले जाते. त्यानुसार यंदाही ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत येळगाव धरण परिसरातील कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
संत निरंकारी मिशन बुलढाणा शाखेचे मुखी हनुमान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सेवादल शिक्षक सुभाष राजपूत यांच्या नेतृत्वात शेकडो सदस्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे विविध स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे.
Users Today : 9