बुलढाणा प्रतिनिधी :
लोणार तालुक्यातील चिखला–काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादात महिलांना अमानुष मारहाण झाल्याच्या घटनेचा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बुलढाणा व ‘आम्ही बुलढाणाकर’ यांनी तीव्र निषेध केला आहे.
आज शिवप्रेमींनी संगम चौक येथील शिवस्मारकासमोर जमून शिवरायांना अभिवादन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
कठोर कारवाईची मागणी
निवेदनात आरोपींवर विविध कलमे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. काही सामाजिक घटक वातावरण दूषित करत असून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास शिवप्रेमी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही देण्यात आला.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन दांदडे, संकल्पक व नगरसेवक सुनील सपकाळ यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
“शिवरायांची शिकवण सर्वधर्म समभावाची”
नगरसेवक सुनील सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; मात्र एखाद्या गावात त्यांचा पुतळा बसवायला जागा मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. महिलांना समानतेची वागणूक देण्याची शिकवण शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी दिली. पुतळा बसविताना महिलांवर अमानुष मारहाण होणे ही विकृत मानसिकता असल्याचा त्यांनी निषेध केला.
“ओबीसी–मराठा वाद कशासाठी?”
सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करत सपकाळ यांनी सांगितले की, विदर्भातील मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी प्रयत्न केले. माळी, धनगर, वंजारी, बंजारा व बारा बलुतेदार समाजही ओबीसी प्रवर्गात आहेत. त्यामुळे कोणत्याही समाजाने आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक दरी निर्माण करू नये.
“जर आपण जातीय-धार्मिक वाद करत असू, तर शिवरायांचे नाव घेणे हा त्यांचा अपमान आहे. शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले,” असे सांगत हा वाद येथेच संपवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या आंदोलनात नगरपालिका उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Users Today : 12