इंदूर–अकोला ट्रॅव्हल्सला भीषण आग; ३० प्रवाशांचा थरारक बचाव नांदुरानजीक राष्ट्रीय महामार्गावरील घटना, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

KHOZ MASTER
2 Min Read

नांदुरा, दि. ७ (प्रतिनिधी) 


इंदूरहून अकोल्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला नांदुरा शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (७ मार्च) दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ३० प्रवाशांचा मृत्यूच्या दाढेतून थरारक बचाव झाला. या घटनेमुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मध्य प्रदेशातील इंदूर येथून ही खासगी बस विदर्भातील अकोलाकडे प्रवास करत होती. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून बस बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर नांदुरा शहराजवळ अचानक बसमधून धूर निघू लागला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच धुराचे रूपांतर भीषण आगीत झाले.

बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर वाहकाच्या मदतीने सर्व प्रवाशांना तत्काळ खाली उतरवण्यात आले. काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला कवेत घेतले; मात्र त्याआधीच सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ याचा प्रत्यय या घटनेत आला.

आग इतकी भीषण होती की प्रवाशांना आपले सामान बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. अनेक प्रवाशांच्या बॅगा, कपडे तसेच महत्त्वाची कागदपत्रे आगीत जळून खाक झाली. मात्र जीव वाचल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.

घटनेची माहिती मिळताच नांदुरा नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. तसेच स्थानिक पोलीस आणि नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना मदत केली. या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज

बसला आग नेमकी कशामुळे लागली याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार बसमधील इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून बसची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांच्या देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

0 9 3 8 5 9
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *