मलकापूर –
शहर व तालुक्यात व्यापाऱ्यांना लक्ष्य करून घडणाऱ्या लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. विशेषतः परप्रांतीय व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, काही संशयित व्यक्ती सोशल मीडिया आणि ऑनलाईन माध्यमांच्या साहाय्याने व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मलकापूर येथे बोलावून लुटमार करत आहेत. मध्य प्रदेश सीमेवरील काही व्यक्ती स्वस्त व दर्जेदार माल उपलब्ध असल्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांशी संपर्क साधतात आणि नंतर संबंधित माहिती स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत पोहोचवली जाते.
व्यापाऱ्यांना रेल्वे स्थानक किंवा शहरातील ठराविक ठिकाणी बोलावले जाते. शहरात आल्यानंतर त्यांना ऑटो रिक्षामध्ये बसवून शहराबाहेरील निर्जन भागात नेले जाते. तिथे धमकावून किंवा मारहाण करून रोख रक्कम, दागिने किंवा मौल्यवान वस्तू लुटल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरातील काही घटनांमध्ये ऑटोरिक्षाचा वापर करून व्यापाऱ्यांवर नजर ठेवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः रात्री काही युवक रेल्वे स्थानक परिसरात ऑटो रिक्षा घेऊन फिरताना दिसतात, ज्यांचा उद्देश व्यापाऱ्यांची माहिती टोळीपर्यंत पोहोचवणे असावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, अट्टल गुन्हेगारांवर कठोर कारवाई न झाल्यास शहरातील व्यापाऱ्यांचे जीव व माल सुरक्षित राहणार नाही.
पोलीस प्रशासनाने अशा घटनांवर लक्ष ठेवून विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे मत आहे.
Users Today : 59