डोणगाव –
शाळांमधील मध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी लागणाऱ्या गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी PM Poshan Shakti Nirman Yojana अंतर्गत सर्व एलपीजी गॅस कंपन्यांच्या व्यवस्थापकांना पत्र देऊन पोषण आहार योजनेस प्राधान्याने गॅस सिलिंडर पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसायही बंद पडल्याचे चित्र आहे. राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय, अनुदानित व आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन म्हणून पोषण आहार दिला जातो. हा आहार शिजवण्यासाठी गॅसचा वापर केला जात असल्याने पुरवठा खंडित झाल्यास विद्यार्थ्यांच्या आहारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका तसेच अनुदानित शाळांसह सुमारे ८६ हजार २१० शाळांमधील जवळपास ९५ लाख विद्यार्थी या योजनेचा दररोज लाभ घेत आहेत. मात्र आखाती देशांतील तणावामुळे एलपीजी गॅस तुटवडा निर्माण झाल्याचे सांगत काही कंपन्यांनी बचत गट व संस्थांना सिलिंडर देण्यास मर्यादा घातल्याचे कळविण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार सुरळीत सुरू राहावा आणि विद्यार्थी आहारापासून वंचित राहू नयेत, यासाठी संबंधित बचत गट व स्वयंपाकगृहांना प्राधान्याने एलपीजी गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Users Today : 5