Deulgaon Raja –
Sant Chokha Sagar Dam परिसरात अवैध रेती चोरीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, काही दिवसांपासून बंद असलेली ही अवैध गतिविधी पुन्हा सुरू झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, डंपर व इतर वाहनांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. काही ठिकाणी उघडपणे ही चोरी सुरू असतानाही संबंधित मंडळ अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, रेती माफियांचा बिमोड करण्यासाठी उपविभागीय अधिकारी Sanjay Khadse तसेच तहसीलदार Vaishali Dongarjal यांनी मागील काही काळात कारवाईचे अनेक दणके दिले आहेत. अवैध रेती उपसा रोखण्यासाठी विशेष पथके, छापेमारी मोहीम आणि नियमित तपासणीही सुरू करण्यात आली आहे. अनेक वाहनांवर कारवाई करून दंडात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
तथापि, महसूल विभागातील काही फितूर मंडळाधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे या कारवाईचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबतही शंका उपस्थित होत आहेत.
‘कुंपणच शेत खातंय’ अशी चर्चा
मंडळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे किंवा संभाव्य संगनमतामुळेच अवैध रेती चोरीला पुन्हा खतपाणी मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
अवैध रेती उपशामुळे नदीपात्रातील धूप वाढण्याचा धोका निर्माण झाला असून भूजलपातळीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा आणि शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
Users Today : 11