बुलढाणा –
न्यायालयाच्या आदेशानुसार आरटीईमधील २५ टक्के प्रवेशासाठी असलेली एक किलोमीटरची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या अटीमुळे अडचणीत आलेल्या पालकांना आता सुधारित अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) Vikas Patil यांनी केले आहे.
आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी जर एक किलोमीटर अंतरावर शाळा उपलब्ध नसेल तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही, असे निरीक्षण Bombay High Court Nagpur Bench येथे दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान नोंदविण्यात आले. त्यानुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी अर्ज करताना असलेली एक किलोमीटरची अट रद्द करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे ज्या पालकांनी एक किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांची निवड करून अर्ज भरले होते तसेच ज्या पालकांनी नोंदणी केली होती, त्यांना आता एक किलोमीटर, एक ते तीन किलोमीटर तसेच तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळांची निवड करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 मधील कलम १२ (१) (सी) नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२५ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ
संबंधित पालकांनी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीच्या पोर्टलवर जाऊन आवश्यक माहिती भरून सुधारित अर्ज करता येणार आहेत. तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत २५ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) Vikas Patil यांनी दिली.
दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२६ च्या पत्रानुसार आरटीई प्रवेशासाठी एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना देण्यात आले होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर ही अट आता वगळण्यात आली आहे.
या निर्णयाच्या अनुषंगाने आरटीई पोर्टलवर पालकांना आपला अर्ज ‘अनकन्फर्म’ करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना यापूर्वी भरलेला अर्ज अनकन्फर्म करायचा असेल त्यांनी आपल्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही शिक्षणाधिकारी Vikas Patil यांनी केले आहे.
Users Today : 3