हजारो भाविकांनी घेतले कामक्षा देवीच्या सोंगाचे दर्शन

KHOZ MASTER
2 Min Read

Kingaon Raja :
येथील ग्रामदैवत Shri Kamaksha Devi यांच्या सोंगाचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. Gudi Padwa च्या दुसऱ्या दिवशी आयोजित या सोहळ्यात हजारो भाविकांनी कामक्षा देवीच्या सोंगाचे मनोभावे दर्शन घेतले.

येथील घनशाम पंडित यांच्या वाड्यात असलेल्या देवीच्या प्रकटस्थान असलेल्या मंदिराच्या प्रांगणात पहाटे पाच वाजता देवीचे सोंग सजविण्यात आले. व्याघ्रावर स्वार असलेले रूप, शेंदूर लावलेला तेजस्वी मुखवटा, डोळ्यांमध्ये काजळ, हातात तलवार, मानेवर रुळणारे कुंतल, पायात पैंजन तसेच हिरवी साडी-चोळी आणि हिरवा चुडा असा अलौकिक व तेजोमय साज धारण केलेल्या कामक्षा मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

पहाटे साडेपाचच्या सुमारास सूर-सनईच्या मंगल स्वरात, डफड्यांच्या निनादात आणि झांजांच्या मंजुळ तालात ‘आई भवानी की जय’च्या जयघोषात देवीच्या सोंगाचे मंदिराच्या दरबारात आगमन झाले. यावेळी गगनचुंबी फटाक्यांच्या आतषबाजीने देवीचे स्वागत करण्यात आले.

कामक्षादेवी मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक पंचपदी खेळण्यात आली आणि त्यानंतर चित्तथरारक असा दैत्यमर्दनाचा सोहळा पार पडला. दैत्यमर्दनानंतर शांत झालेल्या देवीची पारंपरिक विश्वस्त असलेल्या राजे जाधव मंडळींकडून मानाची महाआरती करण्यात आली. यावेळी देवीची खणानारळाने ओटी भरून भक्तांनी प्रार्थना केली.

यानंतर देवीच्या सोंगाची संपूर्ण गावातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. देवीच्या मार्गावर सर्वत्र सुवासिनींनी सडासंमार्जन करून रांगोळ्या काढल्या होत्या आणि पायघड्या अंथरून देवीचे स्वागत केले.

ग्रामप्रदक्षिणेनंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास घनशाम पंडित यांच्या वाड्यात आरती करून देवीचे सोंग उतरविण्यात आले.

दरम्यान, उपस्थित भाविकांच्या साक्षीने पुढील वर्षीच्या पाडव्याच्या मानकऱ्याची घोषणा करण्यात आली. बालकाकडून काढण्यात आलेल्या ईश्वरचिट्ठीमधून विष्णू एकनाथ सानप यांचे नाव पुढील वर्षीच्या पाडव्याचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो भक्तांनी गुलाल उधळून त्यांचे अभिनंदन केले.

भक्तिभाव, परंपरा आणि सांस्कृतिक वैभव यांचा संगम असलेला हा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 5 3 7
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *