पेट्रोल-डिझेल संपणार अफवा; राज्यात पेट्रोल पंपांवर रांगा

KHOZ MASTER
3 Min Read

राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेमुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांना कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात अफवांमुळे वाढलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपयांचे पेट्रोल, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांना २ हजार रुपयांपर्यंत पेट्रोल देण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही अफवांमुळे नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक पेट्रोल पंप चालकाला उपलब्ध साठा, मागणी केलेला आणि प्राप्त साठा याची माहिती पंपावर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, नाशिक शहरात पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. मर्यादित पेट्रोल मिळणार या अफवेने नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर दाखल झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या असून काही पंपांवर पेट्रोल संपल्याने गोंधळ उडाला. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी अधिक टँकर पाठवावेत, अशी मागणी पेट्रोल पंप असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्थानिक पातळीवर जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. शेजारील गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. नायरा कंपनीच्या अनेक पेट्रोल पंपांवर गेल्या काही दिवसांपासून इंधन उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे. टँकर उशिरा मिळत असल्याने पुरवठा सुरळीत होण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. क्रांती चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहनांच्या रांगा रस्त्यावर आल्या आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.

अमरावती शहरातही रात्री उशिरापर्यंत पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. पेट्रोल संपणार या अफवेने अनेकांनी पेट्रोल पंपांवर धाव घेतली. इर्विन चौक परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

नांदेड जिल्ह्यातील बारड येथेही पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली. काही वाहनधारक २०-२० लिटरचे कॅन घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पंपावर दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. पेट्रोल संपणार ही केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही गर्दी कमी होत नसल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी बारड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पेट्रोल पंपांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

0 9 4 6 7 9
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *