मुंबई :
राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. कधी कडाक्याची उष्णता तर कधी अचानक अवकाळी पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर India Meteorological Department ने राज्यासाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
⛈️ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
चंद्रपूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, बीड, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागात गारपिटीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर या भागांमध्ये अवकाळी पावसाने वारंवार हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
☀️ कोकणात उष्णतेचा इशारा
दुसरीकडे कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
नागरिकांनी विशेषतः दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
🌧️ सांगलीत अचानक पावसाची हजेरी
दरम्यान, सांगली शहरासह मिरज परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सकाळपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते, मात्र सायंकाळी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.
सध्या राज्यात काही भागात पाऊस तर काही भागात तीव्र उष्णता अशी मिश्र परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास किंवा बाहेरची कामे करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
Users Today : 30