चिखली –
चिखली येथील शिवाजी महाविद्यालय ने यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत ७० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची गौरवास्पद कामगिरी नोंदवली आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कौशल्य, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर हे यश मिळवत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
महाविद्यालयात आयोजित प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये आयटी, बँकिंग, मार्केटिंग आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी प्रभावी संवादकौशल्य, भक्कम तांत्रिक ज्ञान आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या बळावर आकर्षक वेतनाच्या नोकऱ्या मिळवल्या.
या यशामागे महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. तसेच वंश ट्रेनिंग अँड प्रोजेक्ट्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने जानेवारी महिन्यात आयोजित विशेष प्रशिक्षण सत्रांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील अपेक्षा आणि संधींची सखोल माहिती मिळाली.
एप्रिल महिन्यात महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित विशेष समारंभात ८ एप्रिल रोजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य मधुकर पाटील व संतोष डुकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्राचार्य डॉ. पी. आर. पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. व्ही.यू. पोच्छी, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. पडोळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, दर्जेदार प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे. भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. प्रा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
Users Today : 6