बुलढाणा :
वाढत्या उष्णतेचा आणि येऊ घातलेल्या पावसाळ्याचा विचार करून महावितरणने अकोला परिमंडळात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांना वेग दिला आहे. तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचल्याने वीज यंत्रणेवर ताण वाढला असून संभाव्य बिघाड टाळण्यासाठी ही कामे अत्यावश्यक असल्याचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी सांगितले.
पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपकेंद्रे आणि वीजवाहिन्यांवरील विविध तांत्रिक कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सकाळी ७ ते १२ या वेळेत काही ठिकाणी तात्पुरता वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. ग्राहकांना याबाबत एसएमएसद्वारे पूर्वसूचना देण्यात येत असून पर्यायी वीजपुरवठ्यालाही प्राधान्य दिले जात आहे.
महापारेषण आणि महावितरणच्या समन्वयातून सुरू असलेल्या या मोहिमेत वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, इन्सुलेटर्स बदलणे, रोहित्रांची तपासणी, ऑइल फिल्टरेशन, लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, गंजलेले खांब बदलणे तसेच उपकेंद्रांतील ब्रेकर्स आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल यांसारख्या कामांचा समावेश आहे.
सध्या परिमंडळातील ३३ केव्हीचे ६९ फिडर आणि ११ केव्हीचे २८३ फिडरवरील कामे पूर्ण झाली असून उर्वरित ३३ केव्हीचे १५० आणि ११ केव्हीचे ११६४ फिडरवरील कामे वेगाने सुरू आहेत. उपकेंद्रांमध्ये रिले कोऑर्डिनेशन, अर्थिंग व्यवस्था आणि ट्रान्सफॉर्मर सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या मोठ्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडू नयेत यासाठी नागरिकांनी संबंधित परवानगी घेऊन झाडांची छाटणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंते प्रतिक्षा शंभरकर, सुरेंद्र कटके आणि अजय शिंदे हे नियमितपणे कामांचा आढावा घेत असून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
Users Today : 34