गरिबीवर मात करत स्नेहा गवईची पोलिस दलात भरारी; कष्टाळू आईच्या संघर्षाला यशाची गोडी

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली

तालुक्यातील खैरव (अंबाशी) गावातील भिमकन्या स्नेहा शेषराव गवई हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र पोलिस दलात निवड मिळवून प्रेरणादायी यश संपादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन “शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही” हा ध्यास घेत स्नेहाने बारावी विज्ञान शाखा पूर्ण केली आणि पोलिस भरतीसाठी कठोर मेहनत घेतली.
स्नेहाच्या लहानपणीच वडील शेषराव गवई यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आई सुनिता गवई यांच्या खांद्यावर आली. रोजंदारी मजुरी करून त्यांनी दोन मुलं आणि एक मुलगी यांचा सांभाळ करत संसार उभा ठेवला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.
आईच्या कष्टातून मिळालेल्या संस्कारांमुळे स्नेहाने शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. दिवसरात्र अभ्यास, शारीरिक प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने पोलिस भरतीत यश मिळवत जालना येथील महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवले.
स्नेहाच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतापराव वानखेडे आणि बाबासाहेब जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्नेहाची ही यशोगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. साधनांची कमतरता असली तरी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे स्नेहाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. तिचे यश हे केवळ वैयक्तिक नसून आईच्या त्यागाचा आणि संघर्षाचा विजय असल्याची भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

0 9 6 5 3 8
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *