पुणे —
पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीने सुमारे 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून राज्यभरातून निषेध नोंदवला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. दुपारी ४:३० वाजता पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेत अवघ्या दीड तासात आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास उघड
तपासादरम्यान आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. 1998 आणि 2015 मध्ये त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल होते. याशिवाय, पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गतही त्याच्यावर यापूर्वी गुन्हे नोंदवले गेले होते. त्यामुळे आरोपीची विकृत प्रवृत्ती आधीपासूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
BNS अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत अत्याचार आणि हत्येच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
परिसरात संताप; पोलिसांचे आवाहन
घटनेची माहिती समोर येताच नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
“आरोपीला तातडीने अटक करण्यात आली असून या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी शांतता राखावी,” असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गील यांनी केले आहे.
समाजात खळबळ
या अमानुष घटनेमुळे संपूर्ण समाज हादरला असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
Users Today : 28