बुलढाणा
सततची नापिकी, वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम ३० जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
मात्र शासनाने दिलेल्या मुदतीस आता अवघा दीड महिन्यांचा कालावधी उरल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेसोबतच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकरी बँका आणि सहकारी संस्थांमध्ये चौकशी करत असून, प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ नेमका कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खरीप तोंडावर; पीककर्जाचा प्रश्न गंभीर
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. जुन्या कर्जाच्या थकबाकीमुळे अनेकांची कर्जप्रकरणे रखडली असून, मशागतीसाठी आवश्यक भांडवल उभे करण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची सर्व भिस्त शासनाच्या जाहीर केलेल्या कर्जमाफीवर टिकून असल्याचे चित्र दिसत आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभाग आणि अग्रणी बँकांकडून थकबाकीदार तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आर्थिक ताणामुळे अंमलबजावणी लांबणार?
देशात सध्या आर्थिक ताणाचे वातावरण असून, शासनाकडूनही खर्चात बचतीचा संदेश दिला जात आहे. यापूर्वी राज्य सरकारने तिजोरीवरील वाढता ताण लक्षात घेऊन काही योजनांबाबत सावध भूमिका घेतली होती. अशातच शेतकरी संघटना आणि विरोधकांच्या आंदोलनानंतर सरकारने ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली.
मात्र घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार का, याबाबत आता शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. महसुलावरील दबाव आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शासन या निर्णयाच्या अंमलबजावणीत विलंब करणार तर नाही ना, अशी भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, खरीप हंगामाची तयारी सुरू असताना कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी वेळेत होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शेतकरी संघटनांकडून व्यक्त केले जात आहे.
Users Today : 8