मेहकर
मेहकर तालुक्यातील घाटबोरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाचा उद्रेक झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी शनिवारी थेट मेहकर ग्रामीण रुग्णालय तसेच जानेफळ येथील आयुष्मान आरोग्य मंदिराला भेट देऊन बाधित रुग्णांची विचारपूस केली.
सध्या या घटनेत एकूण ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १८ रुग्ण मेहकर ग्रामीण रुग्णालयात तर २६ रुग्ण जानेफळ येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात दाखल आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आमदारांना दिली.
दरम्यान, प्राथमिक तपासणीत दूषित पाण्यामुळेच हा आजार पसरल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील पाणीपुरवठा यंत्रणा आणि स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रुग्णालय भेटीदरम्यान आमदार सिद्धार्थ खरात यांनी डॉक्टर व आरोग्य अधिकाऱ्यांकडून उपचार व्यवस्था, औषधसाठा, स्वच्छता व्यवस्था तसेच आरोग्य यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली. रुग्णांच्या उपचारात कोणतीही हलगर्जी होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बोलताना आमदार खरात यांनी संताप व्यक्त करत, “नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला.
दरम्यान, नागेशवाडी ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांविरोधात कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आरोग्य संकट निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या भेटीदरम्यान नगराध्यक्ष किशोर गारोळे, आकाश घोडे, संदीप गवई, श्याम निकम, उमेश चनखोरे, गणेश सवडतकर, शंकर सुळकर, गणेश पाखरे, गजानन आदी उपस्थित होते.
Users Today : 8