मुंबई
वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रतीक्षेत असलेल्या पोस्टिंगचा अखेर मंगळवारी शेवट झाला असून त्यांची नियुक्ती राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन (FDA) आयुक्तपदी करण्यात आली आहे. प्रशासनात कडक शिस्त आणि काटेकोर अंमलबजावणीसाठी ओळखले जाणारे मुंढे यांची ही मागील काही वर्षांतील महत्त्वाची नियुक्ती मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २१ वर्षांच्या सेवाकाळात मुंढे यांची ही तब्बल २५ वी बदली आहे. सध्या ते सचिव दर्जाचे अधिकारी असूनही त्यांना आयुक्तपदावर नेमण्यात आले आहे. ही नियुक्ती काही प्रमाणात प्रशासकीय “डाऊनग्रेड” मानली जात असली तरी अन्न व औषधी प्रशासन विभागातील सुधारणा आणि शिस्तबद्ध कारभारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अन्न व औषधी प्रशासन विभाग हा अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेला असून, औषध नियंत्रण, अन्न सुरक्षा आणि तपासणी यंत्रणेतील सुधारणा हे या विभागासमोरील मोठे आव्हान मानले जाते. या पार्श्वभूमीवर मुंढे यांच्याकडून कडक अंमलबजावणी अपेक्षित असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या नियुक्तीमुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत मुंढे यांचे संबंध कसे राहतील, याकडेही लक्ष लागले आहे.
मंत्रालयीन स्तरावर या विभागात यापूर्वी लाचखोरीच्या आरोपांपासून ते इतर वादग्रस्त प्रकरणांपर्यंत विविध मुद्दे चर्चेत आले होते. त्यामुळे या विभागात शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचे मोठे आव्हान नवीन आयुक्तांसमोर असणार आहे.
मुंढे यांच्या नियुक्तीमुळे अन्न व औषधी प्रशासन विभागातील कारभारात काही ठोस बदल होणार का, याबाबत प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
Users Today : 22