महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले; राहुलभाऊ बोंद्रे यांचा सरकारवर हल्लाबोल
चिखली
पेट्रोल-डिझेल दरवाढ, इंधनटंचाई आणि वाढत्या महागाईविरोधात चिखली तालुका काँग्रेसच्या वतीने मंगळवार, २७ मे रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांना एक ते दोन किलोमीटरच्या रांगा लावाव्या लागत आहेत. अनेकांना रात्रभर पेट्रोल पंपावर थांबावे लागत असून २४-२४ तास प्रतीक्षा करावी लागत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे,” असे ते म्हणाले.
“ही महागाई नैसर्गिक नसून मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम आहेत. सरकार जनतेच्या खिशातील पैसा काढून घेत आहे. इराण आणि रशिया भारताला स्वस्त दरात इंधन देण्यास तयार असतानाही केंद्र सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाही. कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यातच खतांच्या दरातही अलीकडे ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.”
सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास चिखली तालुका काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी सभापती विष्णु पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, भाई प्रदीप आंभोरे, नंदुभाऊ शिंदे, श्याम पठाडे, डॉ. माहेमंद इसरार, सचिन बोंद्रे, युवक काँग्रेसचे अंबादास वाघमारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
