नाशिक : नाशिकच्या नांदूर नाक्याजवळ एका खासगी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर खासगी बसने पेट घेतला असून त्यामध्ये ८ ते १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ३२ ते ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि जवान दाखल झाले असून तोपर्यंत प्रवाशी मृत्यूमुखी पडले होते. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती.मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्स या खासगी बसचा यवतमाळहून मुंबईकडे जात असताना नाशिक येथील नांदूर नाक्याजवळील मिरची हॉटेल येथे अपघात झाला. पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान हा अपघात घडला असून या बसचा कंटेनरशी झालेला अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बसने लगेच पेट घेतला. बसमधील प्रवाशी झोपलेले असल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि त्यामुळे ८ ते १० जणांचा मृत्यू झाला आहे. घटना झाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले होते. त्यानंतर जखमींंना बाहेर काढण्यात आले असून जखमी झालेल्या ३४ जणांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून जखमींचा उपचार शासनातर्फे केला जाणार असल्याची माहिती दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
Users Today : 10