गेली दोन वर्ष विविध सणांवरती बंधने होती . त्यामुळे नियमांचे पालन करीत आपण साधेपणाने सण साजरे केले आहेत . मात्र , यंदाची दिवाळी सर्वजन थाटामाटात साजरी करतांना दिसून येत आहेत .त्यामुळे दिवाळीसाठी खरेदी करताना ऑनलाईन खरेदी न करता आपापल्या भागातील स्थानिक गरजू व्यापाऱ्यानां प्राधान्य द्या , असे आवाहन ग्रामीण युवा संघटनेचे विदर्भध्यक्ष नरेंद्र इंगळे यांनी जनतेला केले आहे . कोरोनाच्या संकटाचा फटका सर्व क्षेत्राला बसला आहे . त्यातून व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे . त्यामुळे त्यांना या आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी आपण मदतीचा हात दिला पाहिजे . तेव्हाच स्थानिक व्यवहारास चालना मिळून व्यापारी आणि ग्राहक यांच्यात आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते निर्माण होईल . सध्या तंत्रज्ञानाचा काळ आहे . आपण आता फाईव्ह जी मध्ये आलो आहोत . त्यामुळे आपल्या कुटुंबातील तरुण तरुणी ऑनलाइन खरेदीवर भर देतात . मात्र ऑनलाइन खरेदीत नेहमी फसवणूक आणि लुट झाल्याच्या घटना आणि बातम्या पाहायला मिळतात .त्यामुळे सुध्दा नागरिकांनी स्थानिक दुकानातून खरेदी करणे आवश्यक आहे . स्थानिक व्यापारी हा आपला बांधव आहे . तो वर्षानुवर्ष आपल्या अडी – अडचणीत मदतीला येत असतो . त्याच्याकडे आपण उधारीचे व्यवहार करतो . मात्र , रोखीचे व्यवहार करण्यासाठी आपणांस ऑनलाइन मार्ग का सुचतो ? याचा विचार करुन जनतेने ऑनलाइन खरेदी न करता दिवाळी सणात लागणारे कपडे , किराणा , फटाके , रोषणाईचे , साहित्य , आकाश कंदिल , मिठाई , भांडी , इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तू , मोबाईल , टीव्ही , पंखा तसेच इतर आवश्यक साहित्य स्थानिक व्यापाऱ्यांकडूनचं खरेदी करावे .स्थानिक व्यापारी आपणांस केवळ सामान नाही तर मान – सन्मान सुध्दा देतात , हेही जनतेने खरेदीसाठी बाहेर पडताना आवर्जून लक्षात ठेवायला हवं , असे सांगत स्थानिक व्यापाऱ्यांकडूनचं खरेदी करा , असे आव्हान ग्रामीण युवा संघटना विदर्भ अध्यक्ष नरेंद्र नवनीत इंगळे यांनी केलं.
Users Today : 20