उल्हासनगर : धर्मांतराबाबत तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करत आमदार नीतेश राणे आज उल्हासनगर पोलिसांवर चांगलेच भडकले. या प्रकरणात पोलिसांना जाब विचारण्यासाठी ते उल्हासनगर पोलिस ठाण्यात आले होते. उल्हासनगरमध्ये एका २६ वर्षीय तरुणाने अन्य धर्मीय २४ वर्षांच्या तरुणीला पळवून नेल्याची घटना घडली होती. एकत्र काम करताना या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते; मात्र घरच्यांचा संभाव्य विरोध लक्षात घेत हे दोघे पळून गेले. याप्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी उल्हासनगर पोलिस ठाण्यात तरुणी हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती उल्हासनगर पोलिसांनी थेट पश्चिम बंगाल गाठत वीरभूम जिल्ह्यातील नानूर इथे जाऊन या तरुण आणि तरुणीची भेट घेतली. या वेळी आम्ही लग्न करणार असून आम्हाला परत येण्याची इच्छा नसल्याचे स्टेटमेंट मुलीने पोलिसांना दिले. ही मुलगी सज्ञान असल्यामुळे पोलिस तिला परत आणू शकले नाहीत. याबाबत उल्हासनगरातील भाजप आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, तसेच कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आरोपीसारखी वागणूक देत मारहाण करत त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली, असा आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला. पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले. सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांना विचारले असता, नीतेश राणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याबाबत विचारणा करण्यासाठी आमच्याकडे आले होते आणि आम्ही त्यांना योग्य ती माहिती दिली आहे, असे सांगितले. कार्यकर्त्यांची गर्दी आमदार नीतेश राणे हे पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्याबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणामुळे धर्मांतराचा मुद्दा मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Users Today : 11